छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत असून शहरातील तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. सकाळपासूनच सूर्यकिरणांची तीव्रता जाणवू लागते, तर दुपारच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. उष्ण व कोरड्या वार्यांमुळे उकाड्यात अधिक भर पडत असून, दुपारी घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. सध्या मराठवाडा भागात उष्णतेची लाट कायम आहे. ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नसल्याने तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परिणामी, पुढील काही दिवस उकाड्याची तीव्रता अधिक जाणवणार आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
सध्या तापमानात वाढ होत असल्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. तसेच घरात राहूनही आता उकाडा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दिवस रात्र फॅन, कुलर लावावे लागत आहे.
आणखी दोन अंशाने तापमान वाढण्याचा अंदाज
गेले दोन तीन दिवसांपासून शहरातील तापमान सध्या चांगलेच वाढत आहे. शनिवारपासून अचानकपणे तापमात वाढ झाली आहे. शनिवारी तापमान हे ३९ अंश सेल्सिअसपर्यत होते. त्यानंतर काल अचानक तापमानात वाढ झाली आहे. रविवारपासून शहरातील तापमानाने ४० अंश पार केले होते. मात्र मंगळवारी ४१. ४ अंश सेल्सिअसपर्यत आणखी दोन तीन दिवसांतच तापमान हे ४२ अंशापर्यत जाईल. असा अंदाज हवामान तज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना वर्तविला आहे.